मुंबई प्रतिनिधी
फलटणमधील महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात नवे वळण आले असून, राजकीय व पोलिस वर्तुळांत खळबळ उडाली आहे. शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांवर थेट गंभीर आरोप केल्यानंतर आता दिवंगत पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या पती राजू गोरे यांनीही सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर गंभीर शंका व्यक्त केली आहे.
अंधारे यांनी पत्रकार परिषदेत अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा संदर्भ देत फलटण प्रकरणातही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. “बिद्रे प्रकरणात हस्ताक्षरातील ‘Y’ आणि ‘U’ वेलांटींच्या सूक्ष्म फरकातून सत्य बाहेर आले होते. त्याचप्रमाणे फलटण प्रकरणातील पत्रांमध्ये आणि मृत्यूच्या वेळी हातावर लिहिलेल्या मजकुरात वेलांटीतील फरक संशय निर्माण करणारा आहे,” असे अंधारे म्हणाल्या.
याच पार्श्वभूमीवर अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनीही पुढे येत, सातारा एसपी तुषार दोशी यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. “अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या चौकशीत तुषार दोशी यांनी आरोपी अभय कुरुंदकरला मदत केली होती. त्याबाबत आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही; उलट त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले,” असे गोरे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “त्याकाळी दोशी हे क्राइम डीसीपी म्हणून तपास पाहत होते. पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी एका आरोपीला सरकारी साक्षीदार करण्याची तयारी दाखवली होती, पण दोशी यांनीच तपासात अडथळा आणला. आज पुन्हा हेच अधिकारी फलटण प्रकरणाचा तपास करत असल्याने न्याय मिळण्याबाबत शंका निर्माण होते.”
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “हस्ताक्षरातील फरकाबाबत केलेल्या माझ्या उल्लेखाला राजू गोरे यांनी पुष्टी दिली आहे. तुषार दोशी हेच अधिकारी बिद्रे प्रकरणातही सामील होते,” असा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला आहे.
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचा तपास आता अधिक संवेदनशील बनला असून, या आरोपांनंतर पोलिस आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


