 
                मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतांत रूपांतर होत नाही,” असा आरोप केला जातो; मात्र हा दोष आमचा नसून मतदार याद्यांमधील गैरव्यवहाराचा असल्याचा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
“मतदार याद्या स्वच्छ झाल्या तर विजय-पराभव आम्हाला मान्य. पण लपवाछपवी करून निवडणुका घेणार असाल, तर ही निवडणूक नव्हे, फिक्स मॅच आहे,” असे ते म्हणाले. ते वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बोलत होते.
‘नमो टुरिझम सेंटर’वर थेट इशारा’
राज ठाकरे यांनी रायगड, राजगड, शिवनेरी सारख्या ऐतिहासिक गडांवर ‘नमो टुरिझम सेंटर’ उभारण्याच्या प्रस्तावावर तीव्र आक्षेप नोंदवला.
“सत्ता असो-नसो… गडांवर नमो सेंटर उभारलं तर फोडून टाकणार,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
यातच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली.
“मला पुन्हा मुख्यमंत्री करा म्हणून किती चाटूगिरी करणार? वरती पंतप्रधानांनाही माहिती नाही की इथं काय चाललंय,” असे म्हणत त्यांनी शिंदेंना नामोहरम केले.
“शिवाजी महाराजांच्या गडांवर राजकारण?”
राज ठाकरे म्हणाले,
“डोक्यात सत्ता आली की वाटेल ते करतात. मग ती शिवाजी महाराजांची दुर्गसंस्कृती असो किंवा मुंबईतील जागा… जिथे बोट ठेवले तिथे अडानीला जागा दिली जाते.”
मतदार याद्यांवरील कारवाईची मागणी
मत चोरीच्या आरोपांवरून ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले.
“लोक मतदान करतात आणि त्यांच्या मतांचा अपमान होतो. मतदार याद्या शुद्ध करा. इलेक्ट्रॉनिक मशिन्स नाहीत तर प्रगत देशात अजूनही बॅलेट पेपरवर मतदान होते; हे नरेंद्र मोदीही म्हणाले होते,” असे ते म्हणाले.
मोर्चाची घोषणा, “लोकलनेच येणार”
राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाची घोषणा केली.
“हा मोर्चा दणदणीत निघाला पाहिजे. दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
मोर्चात स्वत: लोकलने प्रवास करून सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दरम्यान डोंबिवलीतील ट्रॅफिकचे किस्से सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
ऐतिहासिक स्थळांचे राजकारण, मतदार याद्या आणि सत्ताधाऱ्यांवर कडक टीका यांमधून राज ठाकरे यांची सभा तापली. निवडणूक पारदर्शकतेचा मुद्दा आणि मुंबईतील गर्दीचा विनोदी उल्लेख यांचा मिलाफ करत त्यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण रंगतदार केले.

 
 
 

