मुंबई प्रतिनिधी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्स साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. दाऊदचा निकटवर्तीय आणि ड्रग्स तस्करीत प्रमुख भूमिका बजावणारा दानिश चिकना ऊर्फ दानिश मर्चेंट याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या डोंगरी परिसरातील दाऊदच्या ड्रग्स फॅक्टरीचे संचालन दानिशकडेच असल्याचे समोर आले आहे.
एनसीबी मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली असून, दानिशविरुद्ध ड्रग्स सिंडिकेट चालवण्याचे गंभीर आरोप आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, डोंगरी भागात भाजीपाल्याच्या दुकानांच्या आडून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. २०१९ साली या ठिकाणी एनसीबीने छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते.
राजस्थानातूनही अटक झाली होती
यापूर्वीही दानिशला राजस्थानातून अटक झाली होती. मात्र, काही काळानंतर तो जामिनावर बाहेर आला आणि पुन्हा ड्रग्सचा धंदा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण मुंबईसह देशभरात दानिशचे नेटवर्क असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
दाऊदचा विश्वासू माणूस
दानिश हा दाऊदचा खास विश्वासू मानला जातो. तो अंडरवर्ल्डमधील युसूफ चिकनाचा मुलगा असून दाऊदसोबत त्याचे निकटचे संबंध आहेत. पोलिस अनेक दिवसांपासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. प्रत्येकवेळी तो चकवा देण्यात यशस्वी ठरत होता; मात्र यावेळी पोलिसांनी त्याला गोव्यात गाठले.
मोठे खुलासे होण्याची शक्यता
दानिशला मुंबईत आणून त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून दाऊद इब्राहिमच्या ड्रग्स नेटवर्कबाबत अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवाईमुळे मुंबईसह देशभरातील अंडरवर्ल्डच्या हालचालींना मोठा धक्का बसला आहे.


