सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता. ३०) सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील दहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर होऊ शकतो, आणि त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल. या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा विचार असून, त्यासोबतच २८९ नगरपालिकांच्या निवडणुकीचाही प्रस्ताव चर्चेत येणार आहे.
बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळ, ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता, मतदार याद्यांवरील हरकती व त्यावरील कार्यवाही यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. यानुसार कोणत्या जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था पहिल्या टप्प्यात निवडणुकीसाठी सज्ज आहेत, हे निश्चित केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे संकेत आधीच स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवरील तयारीला वेग दिला आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (SIR) करण्याची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्र या प्रक्रियेपासून वगळण्यात आला असल्याने राज्यातील निवडणुका वेळेत होतील, असे राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जानेवारी २०२६ मध्ये १४,२३४ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान पार पडले होते. निकाल १८ जानेवारीला घोषित झाला होता. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात ६५८ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी २०२६ मध्ये संपणार आहे. यावेळी नव्या नियमांनुसार सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार आहे.
तत्पूर्वी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस असून, येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या रणशिंगाचा पहिला नाद होण्याची शक्यता अधिक आहे.


