मुंबई प्रतिनिधी
घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनांमधील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता इच्छुक अर्जदारांना २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. त्यामुळे घर खरेदीसाठी इच्छुकांना आणखी एक संधी मिळाली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, संगणकीय सोडत ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. अर्जदारांना २० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम भरता येणार असून, RTGS/NEFT द्वारे २१ नोव्हेंबरपर्यंत भरणा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
चार प्रमुख घटकांत सोडत
पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली ही सोडत चार विभागांत विभागली असून, त्यात खालीलप्रमाणे सदनिकांचा समावेश आहे
म्हाडा गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) : १,६८३ सदनिका
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : २९९ सदनिका
१५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMRDA हद्दीतील) : ८६४ सदनिका
२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (पुणे, पिंपरी-चिंचवड, PMRDA क्षेत्रातील) : ३,२२२ सदनिका
अर्ज प्रक्रियेबाबत माहिती
म्हाडाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी सांगितले की, नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता आणि इतर कारणास्तव मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे अर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे.
अर्जासाठी संकेतस्थळे:
https://lottery.mhada.gov.in
https://bookmyhome.mhada.gov.in
मार्गदर्शक पुस्तिका:
https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मदत केंद्र:
अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी हेल्पलाइन क्रमांक ०२२-६९४६८१०० वर संपर्क साधावा.
म्हाडाने कोणत्याही व्यक्तीला प्रतिनिधी, सल्लागार किंवा एजंट म्हणून नेमलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही एजंटमार्फत व्यवहार करू नयेत, असेही आवाहन पुणे मंडळाने केले आहे.
थोडक्यात:
पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून, अर्जाची अंतिम मुदत आता २० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.


