मुंबई प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नवीन प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. या निमित्ताने शहा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. यावेळी केलेल्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शहा म्हणाले, “महाराष्ट्रात भाजप कोणत्याही कुबड्यांच्या आधारावर उभी नाही, तर आपल्या स्वतःच्या ताकदीवर उभी आहे.” त्यांच्या या विधानाला राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले, “आजचा दिवस महाराष्ट्र भाजप कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा आहे. नवीन कार्यालयाचं भूमिपूजन म्हणजे एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. १९५० पासून आजपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता यांनी पक्ष उभा केला. आमच्यासाठी कार्यालय हे फक्त इमारत नसून मंदिर आहे.”
शहा पुढे म्हणाले, “भारतीय राजकारणात भाजपने ज्या प्रकारे आपलं वेगळं स्थान निर्माण केलं, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप ही एक मजबूत शक्ती म्हणून उभी आहे. २०१४ मध्ये आम्ही चौथ्या क्रमांकावर होतो, पण आज पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. देशाची जनता भाजपच्या स्वागतासाठी तयार आहे.”
राज्यात आगामी निवडणुकांची चाहूल लागलेली असताना शहा यांनी कार्यकर्त्यांना विजयासाठी एकदिलानं लढण्याचं आवाहन केलं. “मी केवळ डबल इंजिन सरकारवर समाधानी नाही, मला ट्रिपल इंजिन सरकार हवं आहे,” असं म्हणत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा भाजपचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा संदेश दिला.
राज्यातील सत्तासमीकरणांवर त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून, शहांचा हा ‘कुबड्यांवर नाही तर स्वतःच्या ताकदीवर उभा असलेला भाजप’ हा संदेश नेमका कोणाकडे निर्देशित आहे, याबद्दल राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे.


