मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई वगळता सर्व महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षणाचा कार्यक्रम आज, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, त्याचे पालन करण्यासाठी हा कार्यक्रम तातडीने आखण्यात आला आहे.

चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रक्रिया: नगर विकास विभागाने २० मे २०२५ रोजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुकीसाठी ‘महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम, २०२५’ निर्गमित केले आहेत. या नियमांनुसार, ही आगामी निवडणूक आरक्षणाच्या चक्रानुक्रमे फिरविण्याच्या प्रयोजनार्थ ‘पहिली निवडणूक’ मानली जाईल.
आरक्षण सोडतीचा महत्त्वाचा कार्यक्रम (प्रपत्र-१ नुसार):
आरक्षणास मान्यता घेणे: आरक्षित जागांची संख्या निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे.
आरक्षण सोडत:
सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याची तारीख आहे – ८ नोव्हेंबर २०२५.
आरक्षणाची सोडत काढून आयोगाच्या मान्यतेसाठी निकाल सादर करण्याची तारीख – ११ नोव्हेंबर २०२५.
हरकती व सूचना: प्रारुप आरक्षण १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येईल, तर हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख २४ नोव्हेंबर २०२५ आहे.
अंतिम आरक्षण: हरकतींवर निर्णय घेऊन आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षणाची अधिसूचना २ डिसेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार विहित वेळेत कामकाज पार पाडून आरक्षण अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत


