नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या समाज कल्याण अधिकारी, गट-ब तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातून केदार गरड यांनी सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून वैभव भुतेकर यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे.
मे २०२३ मध्ये एमपीएससीने समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात काढली होती. यामध्ये समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त (गट-अ), समाज कल्याण अधिकारी (गट-ब), तसेच गृहप्रमुख (गट-ब) अशा विविध पदांचा समावेश होता. या पदांसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते.
आरक्षण सुधारित करण्याच्या प्रक्रियेमुळे या परीक्षा काही काळ स्थगित करण्यात आल्या होत्या. अखेर सुधारित आरक्षणानुसार परीक्षा १८ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आली. विशेष म्हणजे, यापूर्वी खुल्या गटातून अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्या आरक्षणानुसार अर्ज सादर करण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली होती.
ताज्या निकालानुसार अनेक उमेदवारांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, राज्यात नव्या समाजकल्याण अधिकाऱ्यांचा बॅच कार्यरत होणार आहे. काही दिवसांपूर्वीच समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पदाचा निकाल जाहीर झाला होता, ज्यात राज्यातील शेकडो उमेदवारांनी यश मिळवले आहे.
वैभव भुतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास
राज्यातील दुसरा क्रमांक पटकावणारे वैभव भुतेकर हे स्पर्धा परीक्षेतील चिकाटी आणि स्वबळाचे उदाहरण ठरले आहेत. कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता त्यांनी आपल्या गावीच नियमित अभ्यास करून ही स्पर्धा जिंकली. नियोजन, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
भुतेकर यांनी यापूर्वीही अनेक सरकारी पदांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. २०२१ मध्ये कर सहाय्यक, त्याच वर्षी मंत्रालय लिपिक, आदिवासी आश्रमशाळेतील गृहपाल, तसेच २०२३ मध्ये जालना जिल्हा परिषदेच्या वालसा खालसा शाळेत शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती. सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत असून, समाजसेवेच्या भावनेने कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे.
या निकालानंतर राज्यातील स्पर्धा परीक्षार्थ्यांमध्ये नव्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. समाज कल्याण विभागात नव्या अधिकाऱ्यांची भर पडल्याने प्रशासनाच्या सामाजिक न्यायविषयक कामकाजाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


