
नागपूर प्रतिनिधी
राज्यात सध्या मतदार याद्यांतील घोळ आणि मतचोरीचे आरोप यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट भाजपवर मतचोरीचे आरोप करत धडक मोहीम उघडली असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रामगिरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्याचे मान्य केले. मात्र, या घोळाचा अर्थ मतचोरी असा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट करत काँग्रेससह विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.
“मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, हे मी मान्य करतो. पण त्यामुळे निवडणुकीचा निकाल बदलतो, असा दावा चुकीचा आहे. हा घोळ आजचा नाही, अनेक वर्षांपासून सुरू आहे. आम्ही स्वतः २०१२ मध्ये याचिकाही दाखल केली होती. मात्र त्यावर अद्याप निकाल लागलेला नाही,” असे फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मतदार याद्यांमधील दुबार नावे हा प्रशासनातील तांत्रिक आणि मानवी त्रुटींचा परिणाम आहे. शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतर करणारे लोक नवीन ठिकाणी नावे नोंदवतात; पण जुन्या गावातील नोंदी काढून टाकत नाहीत. त्यामुळे एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी दिसते. पण त्यामुळे तो मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करतो, असे नाही. त्यामुळे मतचोरीचा प्रश्नच येत नाही. याचा निवडणुकीच्या निकालावर नव्हे, तर केवळ मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो.”
ग्रामीण भागात मात्र अशी समस्या कमी असल्याचेही त्यांनी नमूद केले. “गावांमध्ये लोकसंख्या मर्यादित असते, त्यामुळे कोण आले-कोण गेले, याची माहिती सगळ्यांना असते,” असे ते म्हणाले.
काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, “आमच्या मतदारसंघात दुबार नावे असल्याचा आरोप काँग्रेस करते. पण काँग्रेसचे आमदार-खासदार ज्या मतदारसंघांतून निवडून आले, तिथेही अशीच परिस्थिती आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. योग्य वेळी ते समोर आणू. मग त्या मतदार याद्या ‘शुद्ध’ मानायच्या का? जर दुबार नावांमुळे आम्ही निवडून आलो, तर त्याच तर्काने तेही मतचोरीतून निवडून आले, असे म्हणावे लागेल का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मतदार याद्यांतील गोंधळ दुरुस्त करण्याची मागणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली असताना, काँग्रेसने यासाठी स्वतंत्र समितीही नेमली आहे. त्या समितीने काही दुबार नावे असल्याचे निदर्शनास आणले असले तरी, “घोळ मान्य आहे, पण मतचोरी नाही,” असा ठाम पवित्रा फडणवीसांनी घेतला आहे.
“आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रथम आपल्या मतदारसंघातील याद्या पाहाव्यात. राजकारणासाठी मतदारांचा विश्वास गमावणे, हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.”
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री