मुंबई प्रतिनिधी
प्रेमाच्या नात्यातून फुललेली कहाणी अखेर रक्ताने माखली. काळाचौकी परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत प्रियकराच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीने उपचारादरम्यान अखेर प्राण सोडले. मनिषा यादव (वय २२) असे या तरुणीचे नाव असून, तिच्यावर हल्ला करणारा प्रियकर सोनू बराय (वय २४) याने हल्ल्यानंतर स्वतःचाही गळा चिरून आत्महत्या केली होती.
शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेने लालबाग-आंबेवाडी परिसर हादरला. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा आणि सोनू यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या आठवड्याभरात मनिषाने इतर कुणाशी संबंध ठेवत असल्याचा संशय सोनूला होता. या शंकेने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यातूनच या दुर्दैवी घटनेला सुरुवात झाली.
हल्ल्यानंतर नर्सिंग होममध्ये घुसूनही मारहाण
सकाळी मनिषा घराबाहेर पडताच सोनूने तिचा पाठलाग केला. दोघांमध्ये रस्त्यावर जोरदार वाद झाला. वाद वाढताच संतापलेल्या सोनूने चाकू बाहेर काढून मनिषावर वार केले. गंभीर जखमी झालेली मनिषा जीव वाचवण्यासाठी धावत-पळत जवळच्याच ‘आस्था नर्सिंग होम’मध्ये पोहोचली. पण संतापाच्या भरात असलेला सोनू थेट नर्सिंग होममध्ये शिरला आणि तिच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला केला.
त्यानंतर तिथल्याच लोकांच्या आरडाओरडीत सोनूने स्वतःचाच गळा चिरून घेतला. घटनेनंतर तात्काळ दोघांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सोनू बराय याला दाखल होताच मृत घोषित केले, तर गंभीर जखमी मनिषाला पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र हल्ल्यात झालेल्या तीव्र रक्तस्त्रावामुळे सायंकाळच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.
परिसरात शोककळा, पोलिसांचा तपास सुरू
आंबेवाडी परिसरातील या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. “सोनू व मनिषा दोघेही एकाच गल्लीतील. त्यांचे प्रेमसंबंध सर्वांनाच ठाऊक होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात भांडण सुरू होते,” अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.
काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातील तणाव व संशयातून हा प्रकार घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. “सोनूला संशय होता की मनिषा दुसऱ्या कुणाशी बोलते. याच संशयाने त्याने अत्यंत टोकाचा निर्णय घेतला,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
एक प्रश्न अनुत्तरितच…
एका क्षुल्लक शंकेने दोन तरुणांचे आयुष्य संपवले. प्रेमातून सुरु झालेली नाती आज हिंस्र संशयाच्या भिंतीवर आदळत आहेत. शहरात वाढत चाललेल्या अशा घटनांमुळे प्रश्न उभा राहतो. नात्यांमधील विश्वास, संवाद आणि मानसिक संतुलन हरवून बसलेले हे तरुण समाजासाठी धोक्याची घंटा तर नाही ना?
मुंबईसारख्या महानगरात अशा हृदयद्रावक घटना केवळ गुन्हेगारी आकडेवारीत भर घालत नाहीत, तर एक गंभीर सामाजिक संदेशही देतात, संशय, असूया आणि राग यांचे एकत्र मिश्रण म्हणजे मृत्यूचा सापळा.


