
मुंबई | प्रतिनिधी
गोरेगाव परिसरात चोर असल्याच्या संशयावरून चार जणांनी 26 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता या चौघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
हर्षल रामसिंग परमा (26) असे मृत तरुणाचे नाव आहे. गोरेगावमधील मोतीलाल नगर परिसरात तो आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. शनिवारी रात्री तो घरातून बाहेर पडला होता. पहाटे तीनच्या सुमारास तो गोरेगावच्या तीनडोंगरी भागातील राज पॅथ्रोन इमारतीजवळ फिरत असताना, इमारतीत काम करणाऱ्या चार कामगारांना तो संशयास्पद वाटला. हर्षल चोर असून मोबाइल चोरीसाठी आला असावा, असा समज झाल्याने त्यांनी त्याला पकडून इमारतीत नेले आणि हातपाय बांधून बेदम मारहाण केली.
बांबू, लाथाबुक्यांनी झालेल्या या मारहाणीत हर्षल गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षारक्षक पप्पू यादव यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून हर्षलला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हर्षलची आई सुवर्णा परमा हिच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी चारही कामगारांविरुद्ध हत्या आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. चौघेही राज पॅथ्रोन इमारतीतच काम करीत आणि रात्री तिथेच झोपत असल्याचे तपासात समोर आले आहे. पहाटे हर्षल इमारतीजवळ आढळल्याने त्यांनी गैरसमजुतीतून त्याच्यावर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.