नाशिक प्रतिनिधी
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, सासरकडून सततची पैशांची मागणी आणि माहेरहून वस्तू आणण्याचा हट्ट, या समाजाला काळिमा फासणाऱ्या घटना काही केल्या थांबत नाहीत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची जखम अजूनही ताजी असतानाच, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे पुन्हा एकदा अशा अमानुष वास्तवाने राज्याला हादरवून सोडले आहे.
२२ वर्षीय मोहिनी चंद्रकांत अहिरे या तरुण विवाहितेने सासरच्या सततच्या छळाला, अपमानाला आणि अमानवी वागणुकीला कंटाळून आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. लग्नाच्या काहीच महिन्यांत सुरू झालेला ‘हुंडा-छळ’ मोहिनीच्या आयुष्यावर गदा ठरला.
सासरकडून ‘मोबाईल घेऊन ये’, ‘गाडी घेऊन ये’, ‘घरून पैसे आण’ या वारंवार मागण्यांवरून घरात सतत वाद व्हायचा, अपमान आणि शिवीगाळ रोजची झाली होती. या सततच्या मानसिक छळामुळे निराश झालेल्या मोहिनीने अखेर आपले जीवन संपवले. तिच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ पसरली आहे.
‘संतप्त माहेरकऱ्यांचा विदारक निर्णय: सासरच्या दारातच अंत्यसंस्कार’
मोहिनीच्या आत्महत्येची बातमी समजताच माहेरचे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी थेट पिंपळगाव धाबली येथे सासरी धाव घेतली आणि जाब विचारला. त्यानंतर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, माहेरकऱ्यांनी समाजाला हादरवणारा निर्णय घेतला. आपल्या लेकीचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या दारातच करण्याचा.
सासरच्या उंबरठ्यावरच लाडक्या मुलीची चिता पेटवून त्यांनी केवळ आपला आक्रोशच नव्हे, तर हुंडेशाहीविरोधातला जिवंत संदेश समाजासमोर ठेवला. “हुंडा मागणाऱ्यांच्या दारातच आमच्या लेकीने चिता पेटवली!” या एकाच वाक्यात हजारो असहाय बापांच्या मनातील जखम दडलेली आहे.
सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेनंतर चांदवड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, मृत विवाहितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महिलांवरील अत्याचार आणि हुंड्याच्या नावाखाली सुरू असलेल्या मानसिक छळाविरोधात पुन्हा एकदा समाजमन पेटून उठले आहे.


