नाशिक प्रतिनिधी
नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांत चढउतार सुरूच आहेत. नाशिकमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला असून, पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांनी ‘कमळ’चा निरोप घेत ‘मशाल’ हाती घेतली आहे. या हालचालीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) गटाचा नाशिकमधील प्रभाव वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड सोमवारी शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी ही घडामोड महत्त्वाची ठरणार आहे.गायकवाड दाम्पत्याचा राजकीय प्रवास विशेष ठरला आहे. हेमंत गायकवाड हे पूर्वी शिवसेनेत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. याच काळात संगीता गायकवाड मनसेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
पुढे या दोघांनी भाजपचा झेंडा हातात घेतला आणि कमळ चिन्हावर निवडणुकीला लढून विजय संपादन केला. आता पुन्हा एकदा ते दोघे उबाठात दाखल होत आहेत.नाशिकमधील ठाकरे गटासाठी हा प्रवेश ‘रिव्हर्स इनकमिंग’ म्हणून बघितला जात आहे. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, आता पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर उबाठाचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रवेशामुळे नाशिकमधील राजकीय हालचालींना नवी दिशा मिळेल, असे पाहणाऱ्यांचे मत आहे.


