
मुंबई प्रतिनिधी
दिवाळीचा उत्साह, रोषणाई आणि फटाक्यांचा जल्लोष यामध्ये मुंबईकरांसाठी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईने थेट दुसरे स्थान मिळवले आहे. फटाक्यांच्या धुरासोबत बांधकाम आणि वाहनांच्या धुराची भर पडल्याने शहरातील हवा ‘अत्यंत नाजूक’ टप्प्यात पोहोचली आहे.
मंगळवारी मुंबईचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) तब्बल 187 इतका नोंदवला गेला. हा स्तर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
बीकेसीत विक्रमी प्रदूषण
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) भागात हवेची गुणवत्ता सर्वाधिक खालावली असून येथील AQI 334 इतका नोंदला गेला. ‘गंभीर’ श्रेणीत मोडणाऱ्या या स्तरामुळे श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भागातील व्यावसायिक गर्दी, वाहनांचा धूर आणि चालू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणाचा स्तर विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे निरीक्षण आहे.
कोणत्या भागात किती AQI?
मुंबईतील अनेक भाग ‘खराब ते अत्यंत खराब’ श्रेणीत गेले आहेत.
वांद्रे (178)
वांद्रे पूर्व (170)
बोरिवली पूर्व (156)
अंधेरी चकला (168)
सीएसएमटी परिसर (199)
कुलाबा (170)
देवनार (183)
जुहू (154)
कांदिवली पूर्व (165)
कुर्ला (156–160)
मालाड (197)
माझगाव (196)
नेव्ही नगर, कुलाबा (247)
पवई (179)
वरळी (204)
सायन (165)
शहरातील बहुतांश भागांमध्ये हवा गुणवत्तेची पातळी 150 ते 200 दरम्यान आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
प्रदूषण वाढीमागची कारणे
तज्ज्ञांच्या मते, फटाक्यांतून बाहेर पडणारे सूक्ष्म कण (PM 2.5 आणि PM 10) हवेत दीर्घकाळ टिकून राहतात. याशिवाय, हिवाळ्याच्या प्रारंभी वाऱ्याची गती कमी झाल्याने धुराचे कण वातावरणात अडकून बसले आहेत.
काय काळजी घ्याल?
महापालिकेने नागरिकांना पुढील उपाय करण्याचे आवाहन केले आहे.
बाहेर पडताना मास्क वापरा
• शक्यतो घरातच राहा, खिडक्या बंद ठेवा
• वृक्षारोपण आणि हिरवळ वाढवण्यावर भर द्या
• पर्यावरणपूरक फटाके वापरा
दरवर्षी दिवाळीनंतर वाढणाऱ्या प्रदूषणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. हवेतील विषारी कणांमुळे श्वसनरोगी रुग्णसंख्येत वाढ होण्याचा इशाराही आरोग्य विभागाने दिला आहे.
मुंबईचा हा ‘धूराळा’ उत्साहात काळी छाया टाकणारा ठरत आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक मुंबईकराने पुढाकार घेणे, हाच या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.