
सातारा | प्रतिनिधी
सातारा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने कराडमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तिघा संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून तीन देशी बनावटीच्या पिस्तुला, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल हँडसेट आणि ब्रीझा कार असा एकूण ८,५१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा अवैध शस्त्रधारकांविरोधात मोहीम राबवण्याचे निर्देश गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पथकाला दिले.
पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने १९ ऑक्टोबर रोजी कराड व परिसरात गस्त घालत असताना करवडी येथील शामगाव घाटाजवळ सापळा रचला. ब्रीझा कार क्र. एमएच-५०-एल-४२८९ येताना दिसल्यावर पथकाने कार थांबवून आत असलेल्या तिघा संशयितांना ताब्यात घेतले.
तपासाअंती त्यांच्या जवळून देशी पिस्तुला, मॅगझीनसह जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य मिळाले. याप्रकरणी कराड पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले.
अटक आरोपी: कार्तीक अनील चंदवानी, ऋतेष धर्मेंद्र माने, अक्षय प्रकाश सहजराव
या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.