
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईत मोठ्या अणुघातपाताचा कट उधळण्यात तपास यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) शास्त्रज्ञ असल्याचे भासवणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्या घरातून अणुबॉम्ब डिझाइनशी संबंधित १४ अत्यंत संवेदनशील नकाशे जप्त करण्यात आले आहेत.
वर्सोवा परिसरातील अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद (Akhtar Hussain Kutubuddin Ahmed) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि गुप्तचर विभाग (IB) यांच्या सहकार्याने ही कारवाई पार पडली.
घरावर छापा आणि धक्कादायक उघड
वर्सोव्यातील अख्तरच्या घरावर छापा टाकला असता, तपास अधिकाऱ्यांना गोपनीय कागदपत्रांचा मोठा साठा सापडला. या कागदपत्रांमध्ये अणुशक्ती केंद्राशी संबंधित तांत्रिक माहिती, नकाशे आणि काही महत्त्वाचे संशोधन डेटा असल्याचे समजते.
या नकाश्यांचा वापर कशासाठी होणार होता? हे दस्तऐवज अख्तरकडे कसे आले? यामागे आणखी कोणाचा हात आहे का? या सर्व बाबींचा तपास एनआयए आणि आयबीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका?
प्राथमिक चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारे असल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाभा अणु संशोधन केंद्र काय आहे?
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) हे भारतातील अणु संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचे प्रमुख केंद्र आहे. मुंबईतील ट्रॉम्बे येथे मुख्यालय असलेले हे केंद्र अणु ऊर्जा, विज्ञान आणि संरक्षणाशी निगडित संशोधनात अग्रगण्य आहे.
१९५४ साली डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी ‘अॅटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट, ट्रॉम्बे’ (AEET) या नावाने या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर १९६७ मध्ये या संस्थेचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) असे ठेवण्यात आले.
भारतीय अणु कार्यक्रम, ऊर्जा निर्मिती, रेडिओआइसोटोप्स निर्मिती आणि अण्वस्त्र विकास या क्षेत्रात बीएआरसीची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
तपास यंत्रणांकडून अख्तर हुसेनच्या संपर्कांची पडताळणी सुरू असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणाचे आणखी गंभीर पैलू समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.