
नाशिक प्रतिनिधी
नाशिक : भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक युद्धविमान ‘तेजस एमके 1 ए’ने आपले पहिले उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण करत देशाच्या संरक्षण इतिहासात नवा अध्याय रचला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित होते.
या प्रसंगी राजनाथ सिंह यांनी ‘तेजस एमके 1 ए’सोबतच ‘एलसीए एमके 1 ए’च्या तिसऱ्या उत्पादन व्यवस्थेचे तसेच ‘एचटीटी-40’ विमानाच्या निर्मितीच्या दुसऱ्या व्यवस्थेचे उद्घाटन केले. या सर्व विमाने ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या (HAL) नाशिक येथील केंद्रात तयार करण्यात आली आहेत.
उद्घाटनानंतर तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना राजनाथ सिंह म्हणाले, “नाशिकची भूमी त्र्यंबकेश्वरासारख्या पवित्र स्थळाची आहे. या भूमीत शत्रूचा विनाश करणाऱ्या भगवान शंकराचे वास्तव्य आहे. त्या भूमीत तयार झालेले हे ‘तेजस’ विमानही शत्रूच्या छातीत धडकी भरवेल.” त्यांनी सर्व संशोधक, अभियंते व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
“छाती गर्वाने फुगली”
“आज जेव्हा मी भारतनिर्मित ‘तेजस’, ‘सुखोई एसयू-30’ आणि ‘एचटीटी-40’ या विमानांना आकाशात झेप घेताना पाहिले, तेव्हा माझी छाती अभिमानाने फुगली,” असे राजनाथ सिंह म्हणाले. “एकेकाळी भारत आपल्या संरक्षणसामग्रीसाठी इतर देशांवर अवलंबून होता. पण गेल्या दशकात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताने मोठी झेप घेतली आहे. आज आपल्या संरक्षण आवश्यकतेपैकी तब्बल 75 टक्के सामग्री देशातच तयार होते,” असे त्यांनी सांगितले.
संरक्षणसामग्री निर्यातीत विक्रमी वाढ
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “दहा वर्षांपूर्वी भारताकडून होणारी संरक्षण सामग्रीची निर्यात एक हजार कोटी रुपयांहून कमी होती. आज ती 25 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हे आत्मनिर्भर भारत धोरणाचे फलित आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “2029 पर्यंत देशात 3 लाख कोटी रुपयांच्या शस्त्रनिर्मितीचे आणि 50 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य आमच्यासमोर आहे. सध्याचा विकासदर पाहता ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील, असा मला विश्वास आहे.”
‘तेजस एमके 1 ए’च्या यशस्वी उड्डाणामुळे भारताच्या सामरिक क्षमतेत नवी भर पडली असून, देशाच्या संरक्षण उद्योग क्षेत्राने आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाची झेप घेतली आहे.