
सातारा प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात सातार्याचे स्थान नेहमीच वेगळे राहिले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदापासून ते खासदारकीपर्यंत सर्वच ठिकाणी सातार्याची छाप आहे. आता नगरपालिकेच्या नव्या हद्दवाढीने शहराची रचना, राजकारण आणि विचार या तिन्ही पातळ्यांवर बदल घडत आहेत. या नव्या सातार्यात तरुणपिढी ‘नवे सातारा, नवे चेहरे’ अशी हाक देत आहे.
सातारा नगरपालिकेची नवी इमारत आता पूर्णत्वास येत असताना, नव्या चेहर्यांनीच तिथे प्रवेश करावा, अशी मागणी शहरभर उमटत आहे. नगरपालिकेची निवडणूक ही केवळ राजकीय नसून सातारा शहराच्या आगामी दशकाचे दिशानिर्देश ठरवणारी ठरणार आहे.
राजेंचे समीकरण आणि बदलाचा प्रवाह
पूर्वी स्व. अभयसिंहराजे व उदयनराजे भोसले यांच्या तणावपूर्ण स्पर्धेपासून ते नंतरच्या उदयनराजे-शिवेंद्रराजे संघर्षापर्यंत सातारा नगरपालिकेच्या निवडणुका नेहमीच प्रतिष्ठेच्या राहिल्या. काही काळ मनोमिलनानंतरही मतभेद पुन्हा वाढले, मात्र लोकसभेपूर्वी दोन्ही राजेंमध्ये झालेल्या समेटाने विकासाचे नवे पर्व सुरू झाले.
या दोन्ही नेत्यांनी सातार्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली आहेत. हद्दवाढीमुळे शहराचा विस्तार होत आहे. या बदलांमुळे नव्या पिढीमध्ये राजकारणाविषयी उत्सुकता वाढली असून अनेक तरुण नेतृत्व पुढे येत आहे.
ज्येष्ठांचा सन्मान, तरुणांची गरज
शहरातील अनुभवी नगरसेवकांचा अनुभव जपून ठेवत, नव्या पिढीला संधी देणे ही वेळेची गरज असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. सातारा ‘पेन्शनर सिटी’ ही ओळख मागे टाकून ‘एनर्जेटिक सिटी’ म्हणून उदयास यावी, अशी भावना व्यक्त केली जाते.
विरोधी आघाडीची रणनीती
या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडी कोणत्या पद्धतीने तयारी करेल, याकडेही लक्ष लागले आहे. कारभारातील त्रुटी आणि अनियमिततेचा मुद्दा पुढे करून विरोधी पक्ष तरुण उमेदवारांसह लढा देणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शशिकांत शिंदे, राजेंद्र चोरगे, अॅड. वर्षा देशपांडे आणि दीपक पवार यांसारखी नावे चर्चेत आहेत.
आगामी चित्र
नव्या सातार्याची ओळख, वाढते साहित्यिक-सांस्कृतिक वैभव, पर्यटन क्षेत्रातील वाढता ओढा आणि लोकसंख्येचा झपाटा,या सर्वांमुळे शहराचे राजकारणही नव्या दिशेने प्रवास करत आहे. दोन्ही राजे किती नव्या चेहर्यांना पुढे आणतात आणि विरोधी पक्ष किती ताकदीने मैदानात उतरतो, हेच ठरवेल की सातारा किती ‘नवा’ होतो.