
सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वेण्णा लेक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित एकेरी मार्गिका (बायपास रस्ता) आणि कमानी पुलाच्या उभारणीला वन विभागाची अखेर हिरवी झेंडी मिळाली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा अडथळा दूर झाला असून, लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
महाबळेश्वर-पाचगणी मार्गावरील वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांची डोकेदुखी ठरली होती. पर्यटकांच्या हंगामात शहरातील रस्त्यांवर अक्षरशः वाहनांचा ठप्पा बसतो. २० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. विशेषत, मॅप्रो गार्डन आणि वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण होते.
हा प्रश्न सोडविण्यासाठी वेण्णा लेकपासून धनगरवाडा मार्गे मुख्य रस्त्याकडे वाहतूक वळविणारा १७५० मीटर लांबीचा बायपास रस्ता आणि ३० मीटर लांबीचा कमानी पूल बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यात दहा कोटी रुपये रस्ता मजबुतीकरणासाठी आणि १५ कोटी रुपये पूल व रस्त्याच्या बांधकामासाठी खर्च होणार आहेत.
अनेक वर्षांपासून विविध शासकीय परवानग्यांच्या चक्रात हे काम रखडले होते. मात्र, मंत्री मकरंद पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या सहकार्याने वन विभाग व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळवून हा मार्ग मोकळा केला आहे. वन विभागाने या प्रकल्पासाठी तब्बल ७८ गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी सांगितले की, “कमानी पुलावरून पर्यटकांना पावसाळ्यात वेण्णा धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य जंगलाचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. हा पूल स्वतःमध्येच एक नवा पर्यटन पॉइंट ठरेल.
महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून, पर्यटकांना अधिक सुखद आणि सुरक्षित अनुभव मिळणार आहे.