
सातारा प्रतिनिधी
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीत हतबल झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढे सरसावली आहे. बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल १ कोटी २२ लाख ५६ हजार ५९९ रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या धनादेशाचा स्वीकार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बँकेकडून दिल्या गेलेल्या या मदतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत सातारा जिल्हा बँकेने दाखवलेली सामाजिक जबाबदारी ही आदर्शवत आहे. अशा सहकार भावनेतूनच राज्यातील आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन शक्य आहे.
बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी सांगितले की, “बँकेमार्फत १ कोटी रुपयांची थेट मदत, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार आणि संचालकांचा एका सभेचा भत्ता मिळून एकूण १ कोटी २२ लाख ५६ हजार ५९९ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अर्पण करण्यात आली आहे.
पूरग्रस्तांच्या वेदना ओळखून मदतीचा हात देणाऱ्या सातारा जिल्हा बँकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.