
अमृतसर वृत्तसंस्था
बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस विश्वातून तसेच पंजाबी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगातील पहिला शाकाहारी प्रोफेशनल बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंह घुमन (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण फिटनेस क्षेत्र, चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, घुमन हे खांद्याच्या दुखापतीसाठी किरकोळ ऑपरेशन करण्यासाठी अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात गेले होते. हे छोटं ऑपरेशन असल्याने ते त्याच दिवशी परतणार होते. मात्र, उपचारादरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
वरिंदर सिंह घुमन हे केवळ फिटनेसच्या क्षेत्रात नव्हे तर अभिनयातही नावारूपास आलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी *“मिस्टर इंडिया २००९”*चा किताब पटकावला होता, तसेच *“मिस्टर एशिया चॅम्पियनशिप”*मध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता. बॉडीबिल्डिंग विश्वात त्यांना “द ही-मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जात असे.
घुमन हे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस (IFBB) प्रो कार्ड मिळवणारे पहिले भारतीय बॉडीबिल्डर होते. विशेष म्हणजे, ते जगातील पहिले पूर्ण शाकाहारी व्यावसायिक बॉडीबिल्डर होते. अमेरिकन सुपरस्टार अर्नोल्ड श्वार्झनेगर यांनी त्यांच्या आरोग्य उत्पादनांच्या आशिया प्रचारासाठी घुमन यांची निवड केली होती आणि ते त्यांच्या ब्रँडचे अॅम्बेसेडर बनले होते.
अभिनय क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला होता. “कबड्डी वन्स अपॉन” या पंजाबी चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले आणि तो चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. त्यानंतर त्यांनी “रोअर – टायगर्स ऑफ द सुंदरबन्स”, “मरजावां” आणि अलीकडच्या “टायगर ३” या चित्रपटांत काम केले. “टायगर ३” मध्ये सलमान खानसोबत पडद्यावर झळकलेला वरिंदर पाहून चाहते थक्क झाले होते.
फिटनेसविषयीचा त्यांचा उत्साह आणि समर्पण यामुळे ते युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरले होते. इंस्टाग्रामवर त्यांचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. नियमित वर्कआउट व्हिडिओ आणि प्रेरणादायी पोस्ट्समुळे ते सोशल मीडियावरही लोकप्रिय होते.
वरिंदर सिंह घुमन यांच्या निधनामुळे भारतीय बॉडीबिल्डिंग क्षेत्राने एक समर्पित, शिस्तप्रिय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.