
सातारा प्रतिनिधी
सातारा : सहकार क्षेत्रातील अग्रणी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी गोड केली आहे. २०२४-२५ हंगामात गाळप झालेल्या उसावर प्रति टन १०० रुपये हप्ता संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
शेंद्रे ता. सातारा येथील कारखान्याने यापूर्वीच उसाची प्रति टन ३,२०० रुपये संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा केली होती. त्यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संचालक मंडळाने दिवाळीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रति टन १०० रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी हा हप्ता कारखान्याच्या वार्षिक सभेत आणि बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात जाहीर केला होता. त्यानुसार, या दुसऱ्या हप्त्याची एकूण रक्कम ५ कोटी ७४ लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली.
साळुंखे यांनी शेतकऱ्यांना आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन केले. दिवाळीपूर्वीच अतिरिक्त हप्ता मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.