
सातारा प्रतिनिधी
सातारा: सातारा शहरात शिक्षणासाठी वास्तव्य करणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अनिल विष्णू कोकाटे-पाटील (रा. सावित्री पार्क वारणानगर, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) याला अटक केली आहे.
माहितीनुसार, जुलै २०२५ मध्ये पीडित मुलीची तिच्या मैत्रिणीच्या ओळखीतून संशयिताशी ओळख झाली. संशयिताने मुलीचा मोबाईल क्रमांक घेऊन फोन सुरू केला, तसेच मुलीच्या वडीलांनाही संपर्क साधून घरगुती संबंध वाढवले. ४ ऑगस्ट रोजी संशयिताने मुलीला भेटून ड्रेस घेण्यासाठी जबरदस्तीने थारमध्ये बसवले. नंतर समर्थ मंदिर परिसरातील एका फ्लॅटमध्ये मुलीवर ड्रेस घालण्याची जबरदस्ती केली आणि त्याचाच गैरफायदा घेऊन मुलीवर अत्याचार केला.
अत्याचारानंतर संशयिताने मुलीला धमकी देत आयफोनही भेट दिला. मुलीने नकार दिल्यानंतरही धमक्या देत तो पुन्हा दोनवेळा समर्थ मंदिर परिसरातील फ्लॅटमध्ये अत्याचार केला. या घटनांमुळे मुलगी अबोल झाली. तिच्या कुटुंबीयांनी ही बाब समजल्यावर शहर पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी संशयिताला अटक केली.
तक्रारीत असेही म्हटले आहे की, अत्याचारानंतर संशयिताने मुलीला जबरदस्तीने औषधंही खायला दिली. सातारा शहरातील शिक्षणासाठी आलेल्या मुलीवर तिच्या ओळखीचा नातेवाईक असलेल्या संशयिताचा गैरप्रकार उघडकीस आल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे.