
सातारा प्रतिनिधी
जगातील सर्वोत्तम वैज्ञानिकांच्या यादीत साताऱ्याच्या मायणी (ता. खटाव) येथील सुपुत्र डॉ. प्रसाद एकनाथ लोखंडे यांची निवड झाली आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या टॉप २ टक्के सायंटिस्ट्सच्या यादीत त्यांचा समावेश झाला असून, साताऱ्याचा ठसा जागतिक पातळीवर उमटला आहे.
गिरणी कामगाराच्या कुटुंबातून आलेल्या डॉ. लोखंडेंची वाटचाल खडतर होती. मुंबईतील गिरण्या बंद पडल्याने वडिलांची नोकरी गेली. कुटुंबासह गावाकडे परतावे लागले. दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेत त्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाचा शिखर गाठला.
प्राथमिक शिक्षण मायणीच्या जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक भारतमाता विद्यालयात पूर्ण केले. पुढे रत्नागिरीच्या फिनोलेक्स इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंगची पदवी डिस्टिंक्शनसह मिळवली. शिक्षणासाठी कर्ज काढावे लागले, तर उपजीविकेसाठी लेक्चररची नोकरी केली. पुढे नॅनो मटेरियल फॉर एनर्जी स्टोअरेज ॲप्लिकेशन्स या विषयावर त्यांनी पीएचडी पूर्ण केली.
संशोधनासाठी आयआयटी बॉम्बे, आयआयटी रूर्की, आयआयएससी बंगळूर, शिवाजी व पुणे विद्यापीठ अशा आघाडीच्या संस्थांमध्ये काम केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये १२ हून अधिक शोधनिबंध सादर केले. नॅनो मटेरिअल तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशिनसाठी पेटंटही सादर केले आहे.
सध्या डॉ. लोखंडे हे चिलीतील युनिव्हर्सिदाद टेक्नोलॉजिका मेट्रोपॉलिटाना येथे ‘फोन्डेसिट’ पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणून कार्यरत आहेत. ऊर्जा रूपांतरण, साठवण आणि नॅनोसामग्री या क्षेत्रांत त्यांचे संशोधन सुरू आहे. पुढील वर्षी ते पोलंडमध्ये मेरी क्युरी पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप स्वीकारणार आहेत.
“स्टॅनफोर्ड विद्यापीठाने माझ्या संशोधनाची दखल घेतली. हे यश गुरूजन, सहकारी व कुटुंबीयांच्या आधारामुळेच शक्य झाले. गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेता आले, याचा मला आनंद आहे,” असे डॉ. लोखंडे म्हणाले.
आई जयश्री लोखंडे म्हणाल्या, “प्रसादचा आम्हाला खूप अभिमान आहे. तो आणखी मोठे व्हावा हीच इच्छा.