
नवी मुंबई प्रतिनिधी
तब्बल तीन दशकांपासून चर्चेत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर प्रत्यक्षात साकारतो आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी २.४० वाजता पंतप्रधानांचे विमान येथे उतरून औपचारिक पाहणी व उद्घाटन सोहळा पार पडेल.
मात्र प्रवासी आणि कार्गो सेवा डिसेंबरपासूनच सुरू होणार आहेत, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. टर्मिनल बिल्डिंग हँडओव्हरची प्रक्रिया सुरू असल्याने प्रवासी उड्डाणांना थोडा अवकाश घ्यावा लागणार आहे.
हिथ्रोवर मात करणारी रचना
११६० हेक्टरवर उभारण्यात आलेल्या या विमानतळाची तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी केली जात असली तरी आकार, क्षमता आणि सुविधा या बाबतीत नवी मुंबई विमानतळ अधिक प्रगत ठरणार आहे.
* दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे (ईस्टर्न आणि वेस्टर्न).
* ३.७ किमी लांबीची धावपट्टी.
* एकाच वेळी ७६ खासगी जेट आणि ३५० विमाने हॅंगरमध्ये ठेवण्याची क्षमता.
* देशातील सर्वात मोठी कार्गो व्यवस्था.
* सौरऊर्जेतून ४७ मेगावॅट निर्मिती.
या विमानतळाच्या रचनेतून कमळाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. छत, प्रवेशद्वार आणि काचेच्या दर्शनी भागावर कमळाच्या पाकळ्यांची प्रेरणा दिसून येते. नैसर्गिक प्रकाश, हवा खेळती ठेवणारी जाळीदार रचना आणि सौंदर्यपूर्ण वास्तुकला हे या विमानतळाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचे पाऊल
नवी मुंबई–ठाणे कॉरिडॉर रोड : २६ किमी लांबीचा हा मार्ग ३६०० कोटी खर्चातून उभारला जाणार असून या मार्गामुळे ठाण्यातून थेट विमानतळ गाठणे सोपे होणार आहे.
मुंबई–नवी मुंबई मेट्रो जोडणी : ३२ किमी मार्गावर १९ स्टेशन असलेला प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून मंजुरीची वाट पाहत आहे.
प्रवाशांसाठी नवी सोय
प्रवाशांना टर्मिनल निवडीच्या गोंधळातून मुक्तता मिळणार आहे. कुठल्याही टर्मिनलमधून चेक-इन करता येणार असून ऑटोमेटेड पीपल मुव्हर ही सुविधा यासाठी कार्यान्वित होईल.
उद्घाटनाआधीची चाचणी
११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाईदलाचे सी-२९५ आणि सुखोई विमान यशस्वीरीत्या उतरले होते. त्यानंतर २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोचे पहिले प्रवासी विमान उतरले. एप्रिलमध्ये विमानतळ सुरू करण्याचे प्रयत्न झाले; मात्र उद्घाटनाला पाच महिन्यांचा विलंब झाला.
नावावरून पुन्हा राजकारण
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही जुनी मागणी आता पूर्णतेकडे जाताना दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच संघर्ष कृती समितीला हमी दिली की उद्घाटनानंतर तीन महिन्यांत विमानतळाचे नामकरण करण्यात येईल.
नवी मुंबई विमानतळाचे पहिले टप्पे आता उंबरठ्यावर आहेत. पूर्ण क्षमतेने २०३६ पर्यंत विकसित होणारं हे विमानतळ दरवर्षी तब्बल नऊ कोटी प्रवाशांना सेवा देईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.