
सातारा प्रतिनिधी
साताऱ्यात आज जिल्हा ओबीसी महासंघाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित मेळाव्यानंतर संघटनेने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले.
निवेदनात महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर रोजी “कुणबी-मराठा, मराठा-कुणबी” दाखल्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचा दावा आहे की या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येत आहे. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दाखलेधारक मराठा-कुणबी यांना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लाभ मिळू नये, यासाठी तातडीने नवीन जीआर जाहीर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
संघटनेने स्पष्ट केले की, मराठा समाजातील गोरगरीब बांधवांविषयी ओबीसींमध्ये आदर आहे आणि त्यांना १९ टक्के स्वतंत्र आरक्षण दिले जावे, यास पूर्ण मान्यता आहे. शासनाने त्वरित निर्णय घेऊन जातीय सलोखा टिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, ओबीसीसह सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, तसेच प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
हा मोर्चा शांततेत पार पडला. निवेदन पोपटराव गवळी (सातारा जिल्हा ओबीसी महासंघ) व अध्यक्ष भारत लोकरे (सातारा जिल्हा ओबीसी संघटना) यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.