
सातारा प्रतिनिधी
श्रीक्षेत्र जेजुरी येथील मर्दानी दसरा उत्सवाची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे. श्री मार्तंड देवस्थानतर्फे गड परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, खंडोबाच्या गडावर दिवाळसणाचेच वातावरण निर्माण झाले आहे.
या पारंपरिक सोहळ्यातील पालखी विधी गुरुवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता खंडोबा गडातून कडेपठार दरीतील रमणा येथे सिमोलंघनासाठी रवाना होणार आहे. मध्यरात्री अडीच वाजता कडेपठारची पालखी व खंडोबाची पालखी यांची भेट होणार असून, यावेळी परिसरात ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गडावर ऐतिहासिक खंडा (तलवार) उचलण्याची स्पर्धा पार पडणार आहे. गेल्या महिनाभरापासून अनेक तरुणांनी एका हाताने तलवार उचलण्याची सरावस्पर्धा करून तयारी केली आहे. तलवारीच्या कसरती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.
नवरात्रोत्सव काळात गडावर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आता दसऱ्याच्या पारंपरिक जल्लोषासाठी गड परिसर सज्ज झाला असून, जेजुरी नगरीत उत्साहाचे वातावरण आहे.