
पुणे प्रतिनिधी
दसऱ्याच्या दिवशी किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या वृद्ध वडिलांचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना कोथरूडमध्ये घडली. जयभवानीनगर परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून, कोथरूड पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
तानाजी पायगुडे (७२) असे खून झालेल्यांचे नाव असून, त्यांच्या मुलाला सचिन तानाजी पायगुडे (३३) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तानाजींच्या पत्नी सुमन पायगुडे (६८) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायगुडे कुटुंबीय जयभवानीनगरमधील चाळीत वास्तव्यास आहेत. दसऱ्याच्या दिवशी दुपारी तानाजी पायगुडे आणि त्यांचा मुलगा सचिन हे पोटमाळ्यावर बसले होते. औषध टाकण्यासाठी तानाजी यांनी मुलाला दूरचित्रवाणी बंद करण्यास सांगितले. या किरकोळ कारणावरून वाद उफाळून आला. संतापाच्या भरात सचिनने घरातील चाकू उचलून वडिलांच्या गळा व चेहऱ्यावर वार केले.
आरडाओरड ऐकून सुमन पायगुडे या पोटमाळ्यावर गेल्या असता तानाजी गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पसार झालेला सचिन पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत. घटनास्थळी परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पटारे व वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांनी भेट दिली.