
पुणे, प्रतिनिधी
पहाटेच्या अंधारात खांद्यावर वर्तमानपत्रांची पिशवी, पावसाच्या सरींत भिजत, थंडीच्या थरथरीतून वाट काढत वाचकांच्या दारी वेळेवर बातम्या पोचविण्याची जबाबदारी निभावणारे वृत्तपत्र विक्रेते,त्यांच्या घामाच्या थेंबातून स्वप्नांना आकार मिळतो. त्याग, चिकाटी आणि श्रम यांची शिदोरी पुढच्या पिढ्यांच्या यशात उमलताना दिसते. याचेच उदाहरण म्हणजे पुण्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या दोन कन्यांनी मिळविलेली परदेशात उच्चशिक्षणाची संधी.
चिंचवड विभागातील सभासद सुनील सुरवसे यांची कन्या वैष्णवी सुरवसे हिने वैद्यकीय शिक्षणासाठी (एमबीबीएस) जॉर्जियामध्ये प्रस्थान केले आहे. सहा वर्षांच्या या अभ्यासक्रमानंतर ती इंग्लंडमध्ये उच्च वैद्यकीय पदवी (एमडी) करण्याचा मानस बाळगते. तिच्या या प्रवासामागे वडिलांचे कठोर परिश्रम आणि त्यागाची प्रेरणा आहे.
तर स्वारगेट विभागातील सभासद विकास बांदल यांची कन्या दीप्ती बांदल हिने पुणे विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी (आयटी) पूर्ण केल्यानंतर आता जर्मनीतील एसेन येथील एफ.ओ.एम. शास्त्र व उपयोगशास्त्र विद्यापीठात ‘संगणकीय आकडे व व्यवसाय विश्लेषण’ (एम.एस्सी.) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ही संधी मिळविल्यानंतर ती लवकरच जर्मनीकडे रवाना होणार आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रेय पिसे, सचिव अरुण निवंगुणे, कार्याध्यक्ष अनंता भिकोले, उपाध्यक्ष प्रवीण माने, विश्वस्त संजय फाटक, यशवंत वादवणे आदींसह अनेक सभासद या वेळी उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेता हा केवळ कागदांचा गठ्ठा विकत नाही, तर आपल्या मुलांच्या भविष्याची बीजे पेरतो. वैष्णवी आणि दीप्तीच्या यशामुळे संपूर्ण संघटनेचा अभिमान उंचावला आहे,” अशी भावना अध्यक्ष विजय पारगे यांनी व्यक्त केली.