
मुंबई प्रतिनिधी
महायुती सरकारने राज्यातील व्यापारी आणि नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृहे, खाद्यगृहे आणि इतर आस्थापना २४ तास खुल्या ठेवता येणार आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आणि पर्यटकांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र, मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार यांना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी नाही. केवळ इतर व्यावसायिक आस्थापना आणि खाद्यगृहे या नव्या तरतुदीनुसार २४ तास चालू राहतील.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ अंतर्गत आता आठवड्यातील सर्व दिवस दुकाने व आस्थापना उघडी ठेवता येऊ शकतील. तथापि, प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून किमान २४ तास सलग विश्रांती मिळणे आवश्यक आहे.
अधिनियमाच्या कलम २(२) नुसार, दिवसाची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी अशी केली गेली आहे. तसेच कलम १६(१)(ख) अंतर्गत आस्थापना सात दिवस चालू राहू शकतात, परंतु कर्मचारी योग्य प्रमाणात सुटी घेऊ शकतील याची हमी देण्यात आली आहे.
राज्यभरातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांसाठी हा निर्णय एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे, तर राज्यातील रात्रव्यापाराला नवे वारे देण्याची शक्यता आहे.