
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत गुरुवारी (ता. २) विजयादशमीचा जल्लोष, देवींच्या मूर्तींचे विसर्जन आणि विविध राजकीय पक्षांचे दसरा मेळावे या तिहेरी पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अभूतपूर्व असा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांपासून ते विसर्जन घाटांपर्यंत, तसेच राजकीय मेळाव्याच्या ठिकाणांपासून संवेदनशील वस्त्यांपर्यंत पोलीस दल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले असून, एकूण २० हजारांहून अधिक पोलीस मनुष्यबळ रात्रंदिवस गस्त घालणार आहे.
२० हजारांहून अधिक पोलीस तैनात
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, या विशेष बंदोबस्तासाठी सात अतिरिक्त आयुक्त, २६ उपायुक्त, ५२ सहाय्यक पोलीस आयुक्त, २,८९० पोलीस अधिकारी आणि तब्बल १६,५५२ पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जलद प्रतिसाद पथक (QRT), दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्ड तसेच स्थानिक स्वयंसेवकांचीही मदत घेण्यात आली आहे. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची दक्षता घेतली जाणार आहे.
विसर्जन स्थळांवर विशेष लक्ष
मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा, पावसाळी तलाव आणि अन्य प्रमुख विसर्जन स्थळांवर पोलिसांची कडक नजर ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये तुकड्या पाठवल्या आहेत. विसर्जन मार्गांवर वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून, मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय मेळाव्यांवर नजर
शिवाजी पार्क आणि बांद्रा-कुर्ला संकुल आझाद मैदानावर येथे होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्यामुळे पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने सुरक्षा यंत्रणेकडून ध्वनिमुद्रण साधने, सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे यांचा वापर करून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना उत्सव साजरा करताना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. “गर्दीच्या ठिकाणी संयम राखा, संशयास्पद किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिसांना कळवा,” असे पोलिसांनी स्पष्ट केले. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी १०० किंवा ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
सुरक्षिततेतून सणाचा आनंद
विजयादशमी आणि देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. अशा परिस्थितीत कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी यंदा पोलिसांनी अधिक काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. शहरात पोलिसांची उपस्थिती जाणवण्यासारखी असून, नागरिकांना उत्सव साजरा करण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.
मुंबईकरांसाठी हा उत्सव जल्लोषात साजरा करताना सुरक्षिततेच्या भक्कम कवचाखालीच पार पडणार असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.