
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी आदेश जारी करून निवडणुकीच्या मार्गातल्या अडथळ्यांना दूर केले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची अंतिम रूपरेषा
राज्यातील 32 जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या निश्चित झाली असून, 336 पंचायत समित्यांसह प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना आरक्षण निश्चितीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
• अनुसूचित जाती-जनजातीसाठी राखीव जागा निश्चित करण्याचा प्रस्ताव 6 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करावा.
• प्रस्तावांना मान्यता 8 ऑक्टोबरपर्यंत मिळणार.
• आरक्षण सोडतीची सूचना 10 ऑक्टोबरपर्यंत वृत्तपत्रात प्रसिध्द होईल.
• जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडती 13 ऑक्टोबरपर्यंत काढण्यात येईल.
• प्रारुप आरक्षण अधिसूचना 14 ऑक्टोबरला प्रसिध्द.
• हरकती व सूचना 14 ते 17 ऑक्टोबरदरम्यान सादर करता येतील.
• अंतिम आरक्षण 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर, 3 नोव्हेबरपर्यंत राजपत्रात प्रकाशित होईल.
यावेळी निवडणूक प्रक्रियेला गती देताना, नागरिकांना हरकतीसाठी संधी मिळणार आहे, तर प्रशासनाने आरक्षणाची आखणी वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.