
कराड प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. कोयना धरणात पाण्याची आवक पाचपट वाढल्याने शनिवारी दिवसभरात तीन टप्प्यांत सहा वक्री दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला.
धरणाच्या पायथ्याच्या वीजगृहातून सुरू असलेल्या २,१०० क्युसेक विसर्गाशिवाय सकाळी १० वाजता दोन दरवाजांतून ३,२०० क्युसेक, दुपारी १२ वाजता चार दरवाजांतून ६,४०० क्युसेक तर दुपारी दोननंतर सहाही दरवाजांतून तब्बल १८,७६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी कृष्णा-कोयना नदीपात्रातील पाणीपातळी वाढणार आहे.
दरम्यान, पावसाने कोयना पाणलोटाला झोडपून काढले. शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचदरम्यान कोयनानगरला ४२ मिमी. (एकूण ४,६६०), नवजाला ४० मिमी. (एकूण ५,८७९) तर महाबळेश्वरला ४३ मिमी. (एकूण ५,५६४) पावसाची नोंद झाली. बामणोली, पाडळोशी, जांभूर, कागल, मेढा, सांडवलीसह वारणा, कुंभी, धोम-बलकवडी, कास तलाव, उरमोडी, तारळी, मोरणा आदी जलाशय परिसरातही दमदार पाऊस झाला.
उभ्या पिकांचे नुकसान
या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे हाल वाढवले आहेत. ओढे, नाले, तलाव तुडुंब भरल्याने खरीप हंगामातील उभ्या पिकांत पाणी साचले आहे. पिके कुजण्याची प्रक्रिया सुरू असून दर्जाही खालावत आहे. त्यामुळे उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.