
मुंबई प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना–भुसावळ मार्गावर नवी अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज या गाडीचे उद्घाटन झाले असून ५ ऑक्टोबरपासून ही गाडी नियमितपणे धावणार आहे. दर रविवारी सकाळी ७.१० वाजता उधना स्थानकावरून ही गाडी सुटेल. तर ६ ऑक्टोबरपासून प्रत्येक सोमवारी रात्री ही गाडी ब्रह्मपुरी स्थानकावरून सुटणार आहे.
या गाडीला उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा मिळाला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारसह खानदेशातील प्रवाशांसाठी ही गाडी वरदान ठरणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. खानदेशातून मोठ्या प्रमाणात प्रवासी कामानिमित्ताने गुजरातमध्ये जात असल्याने या गाडीचा थेट लाभ त्यांना मिळणार आहे.
अमृत भारत एक्सप्रेस ही नॉन एसी गाडी असून तिला ‘नॉन एसी वंदे भारत’ अशीही ओळख आहे. आठवड्यातून एकदा धावणारी ही सेमी हायस्पीड गाडी प्रवाशांना वेगवान आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
या स्थानकांवर थांबा
व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलगढ, केसिंगा, मुनीगुडा, रायगडा, पार्वतीपूरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा.
गुजरातला नवरात्रोत्सवासाठी किंवा कामानिमित्ताने जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. रेल्वे प्रवाशांना आता अधिक सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.