
मुंबई प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून, मुंबईसह अनेक भागात सकाळपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय हवामान खात्याने मुंबई, पुणे, मराठवाडा आणि नाशिकसह राज्यातील विविध भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांच्या गडगडाटासह रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. मुंबईत सकाळपासूनच आकाश ढगाळ झाले असून अंधुक वातावरण पसरले. पुणे, धाराशिव आणि नांदेडमध्येही सकाळी पावसाचा जोर वाढला.
ठाणे, बीड, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी शिरले असून कळंब तालुक्यातील संजीतपूर गावाचा संपर्क तुटला आहे. तेरणा नदीला पूर आल्याने परिसरातील गावांना प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. गोंदियात रात्रभर पडलेल्या पावसामुळे धानपिकाला मोठा फटका बसला.
दरम्यान, नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोलापुरातील सिना नदीतून धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, उळे-कासेगाव पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि दहिसर भागात अधूनमधून पाऊस सुरू आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या दहा मिनिटे उशिराने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.