
मुंबई प्रतिनिधी
• शैक्षणिक साहित्य वाटप; दानशूरांना आवाहन
• विद्यार्थ्यांसाठी महामानव प्रतिष्ठानचा शैक्षणिक मदत उपक्रम
राज्यातील मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार देण्याचा पुढाकार ‘एक वही, एक पेन’ अभियानाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना लवकरच मोफत वह्या, पेन आदी साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे अध्यक्ष पत्रकार राजू झनके यांनी दिली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मागील दहा वर्षांपासून महामानव प्रतिष्ठानमार्फत ‘एक वही, एक पेन’ अभियान राबवले जाते. महाराष्ट्रभर या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले गेले आहे.
गत आठवड्यातील अतिवृष्टीमुळे विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे पीक, घरे, जनावरे आणि संसाराचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही वाहून गेले किंवा नष्ट झाले. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी अभियान पुढे सरसावले आहे.
या अभियानासाठी दानशूर नागरिक, समाजसेवक यांनी पुढे येण्याचे आवाहनही झनके यांनी केले. साहित्याचे योगदान द्यायचे असल्यास ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. जमा झालेले साहित्य लवकरच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.