
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मला वाचवा, माझे जबरदस्तीने लग्न लावत आहेत… हा एक थरकाप उडवणारा आवाज नियंत्रण कक्षात पोहोचला आणि काही क्षणांतच पोलिसांनी लग्नाच्या मांडवात धडक देत अल्पवयीन मुलीची सुटका केली. अवघ्या पाच मिनिटांत घडलेली ही कारवाई केवळ पोलिसांच्या सजगतेचे नव्हे, तर नियंत्रण कक्षातील महिला कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेचेही प्रतीक ठरली आहे.
Voices You Never Hear, Faces You Never See.
Women in the Main Control Room give insight into what it’s like to be the calm in chaos. They ensure that every call, whether a complaint, concern, or suggestion received on helpline numbers 100/112/103, is addressed without delay. The… pic.twitter.com/bSjvZA4PGb
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) September 22, 2025
आमचे नाव पुढे आले नाही तरी चालेल; पण कोणाचा जीव वाचतो, हाच आमच्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे,असे या नियंत्रण कक्षातील ‘नवदुर्गा’ आत्मविश्वासाने सांगतात.
दररोज तब्बल ५ हजारांहून अधिक कॉल्स येथे नोंदवले जातात. महिलांवरील अत्याचार, अपघात, वाहतूक कोंडी, आग, ज्येष्ठ नागरिकांची मदत, प्रत्येक कॉल मागे एखाद्याचे आयुष्य दडलेले असते. त्या प्रत्येकाला योग्य वेळी पोहोचणारी मदत हीच पोलिसांची खरी परीक्षा असते. या सर्वात महिला अंमलदारांची भूमिका ठळकपणे जाणवते.
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर या पडद्याआड काम करणाऱ्या महिला अंमलदारांचा गौरव करणारा विशेष व्हिडिओ प्रसिद्ध केला. नियंत्रण कक्षातील अंमलदार वैभवी लोखंडे सांगतात, “दररोज १७० ते २०० कॉल्स हाताळावे लागतात. प्रत्येक कॉलमागे निर्णयाचा क्षण असतो.
महिला अंमलदार शालिनी देवरे यांचेही मत तसेच आहे. कधी माहिती अपुरी असते, कधी वेळ कमी. पण तिथे विलंब परवडत नाही. आम्ही तत्काळ संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधतो आणि मदत पोहोचवतो,” असे त्या म्हणाल्या.
अंमलदार किरण नारायणकर यांनी अलीकडील घटनेचा अनुभव सांगताना म्हटले, एका अल्पवयीन मुलीचा रडत कॉल आला. तिचे जबरदस्ती लग्न लावत असल्याचे कळले. वरिष्ठांना कळवताच लगेच हालचाली सुरू केल्या. अगदी अपुऱ्या माहितीवरही पोलिसांनी योग्य ठिकाण गाठले आणि पाच मिनिटांतच बालविवाह थांबवला.
या सर्व घडामोडींमधून हे स्पष्ट होते की, नियंत्रण कक्षातील महिला अंमलदार फक्त कॉल रिसीव्ह करत नाहीत, तर शेकडो जिवांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत दररोज निःशब्द पण मोलाची कामगिरी बजावत आहेत.