
उमेश गायगवळे मुंबई
धर्माच्या नावावर भिंती उभ्या राहतात, समाज विभागला जातो, पण खरी भक्ती या सीमा सहज ओलांडते. याचं जिवंत उदाहरण वाकोला पाईपलाईन, सांताक्रूझ (पूर्व) येथे पाहायला मिळतं. मागील तब्बल ४५ वर्षांपासून एक मुस्लिम दांपत्य, मोहम्मद ताहीर शेख आणि त्यांची पत्नी जुबेदा मोहम्मद ताहीर शेख, जय मातादी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून अखंड श्रद्धा आणि भक्तीभावाने नवरात्रोत्सव साजरा करत आहेत.
वर्गणीशिवाय, स्वखर्चातून उत्सव
सन १९८० मध्ये या दांपत्याने मंडळाची स्थापना केली. इतर ठिकाणी नवरात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा केली जाते, पण शेख दांपत्याने कधीही सार्वजनिक वर्गणी गोळा केली नाही. स्वखर्चाने देवीची मूर्ती बसवून, नऊ दिवस दिवसरात्र भक्तिमय वातावरणात हा उत्सव रंगवला जातो. समाजातील काही दानशूर व्यक्ती मनापासून मदतीचा हात पुढे करतात, पण त्यामागे दिखावा किंवा प्रसिद्धीची हाव नसते.
हजारो भाविकांना दररोज महाप्रसाद
नवरात्र म्हणजे भक्तिमय जागरण, देवीच्या आरत्या आणि भक्तांचा उत्साह. शेख दांपत्याने याला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. दरवर्षी नऊ दिवस भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. दररोज तब्बल हजार ते बाराशे लोक या प्रसादाचा लाभ घेतात. हात जोडून प्रसाद वाटताना शेख कुटुंबाचे हसू आणि आदर पाहून कोणालाही विसर पडतो की हा उत्सव एखाद्या वेगळ्या धर्माच्या कुटुंबाने सुरू केला आहे.
७३व्या वर्षीही उत्साह ओसंडून वाहतो
मोहम्मद ताहीर शेख यांचे वय आता ७३ वर्षे, तर जुबेदा शेख ७० वर्षांच्या आहेत. शरीर थकलेले आहे, चालण्यात जडपणा आला आहे, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आजही पंचवीशीतील तरुणांना लाजवेल असा आहे. देवीच्या मूर्तीसमोर आरती करताना त्यांच्या डोळ्यांतला तेजोमय प्रकाश पाहिला, की खरी भक्ती धर्मापलीकडे असते हे लक्षात येतं.
पुढच्या पिढ्यांचा सहभाग
आज या कार्यात त्यांची मुलं, जावई आणि नातवंडे खांद्याला खांदा लावून सहभागी होतात. प्रसाद वाटण्यापासून सजावटीपर्यंत प्रत्येक कामात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हातभार लावते. हा उत्सव आता केवळ एक धार्मिक सोहळा राहिला नाही, तर एक सामाजिक उत्सव बनला आहे. परिसरातील हिंदू-मुस्लिम समाज एकत्र येतो, एकमेकांशी संवाद साधतो आणि खरी सामुदायिक सलोखा कसा असतो याचं उदाहरण घडतं.
महाराष्ट्राची परंपरा
महाराष्ट्रात धर्मसहिष्णुतेची ही परंपरा नवी नाही. पुण्यातील कसबा गणपतीपासून ते मुंबईतील मोहरम-मिरवणुकीपर्यंत अनेक उदाहरणे आहेत, जिथे हिंदू-मुस्लिम समाज एकत्र येऊन उत्सव साजरे करतात. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या उत्सवात मुस्लिम बंधूंचा सक्रिय सहभाग असो वा औरंगाबादेत रामजन्मोत्सवात मुस्लिम समाजाने दिलेला हातभार, ही परंपरा सलोख्याची आहे. सांताक्रूझ वाकोल्यातील शेख दांपत्याने ती परंपरा पुढे नेली आहे.
श्रद्धेचा अविरत प्रवाह
“जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत हा उत्सव आम्ही सुरू ठेवणार,” असा निर्धार जुबेदा शेख यांनी व्यक्त केला. त्यांच्या शब्दांमागे वर्षानुवर्षांची निष्ठा आहे. धर्माच्या नावावर समाजात वाद पेटतात, पण या साध्या दांपत्याने दाखवून दिलं आहे की खरी भक्ती आणि प्रेम हे कोणत्याही सीमांनी रोखता येत नाही.
धर्मांधतेच्या काळात हा उत्सव फक्त देवीभक्तीचा नव्हे, तर सामाजिक सलोखा, ऐक्य आणि मानवतेचा संदेश देणारा दीपस्तंभ ठरत आहे.