
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना या वर्षी सरकारकडून भाऊबीजची खास भेट मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाने प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी तब्बल ४० कोटी ६१ लाख ३० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गुरुवारी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील एक लाख दहा हजारांहून अधिक सेविका व मदतनीस यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. दिवाळीपूर्वीच ही भाऊबीज भेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश एकात्मिक बालविकास सेवा आयुक्तांना देण्यात आले आहेत.
या निधीचे वितरण आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व प्रकल्प अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. त्यामुळे सेविका व मदतनीस यांना थेट त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
अंगणवाडीतील महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनावर वारंवार वाद होत असताना, सणासुदीच्या काळात मिळणारी ही अतिरिक्त मदत त्यांच्या आर्थिक ओझ्यात थोडा दिलासा देणारी ठरणार आहे.