
सोलापूर प्रतिनिधी
माढा तालुक्यातील बरडवस्तीतील ग्रामस्थांनी तब्बल तीन दिवस पुराच्या पाण्यात अडकून उपाशीपोटी काढल्यानंतर सुटका झाल्याने आज प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “ना अन्न, ना स्वच्छ पाणी… शेवटी जगण्यासाठी गढूळ पुराचे पाणी प्यावे लागले,अशी व्यथा त्यांनी सांगितली.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला. या पुराच्या पाण्याने बरडवस्तीला पूर्णपणे वेढा घातला. जवळपास ३२ ग्रामस्थ घराच्या छतांवर थांबून होते. दोन दिवसांनी दहा जणांना एअरलिफ्टद्वारे बाहेर काढण्यात आलं. मात्र उर्वरित २२ जणांना तीन दिवस जीव मुठीत धरून वाट पाहावी लागली. शेवटी आज सकाळी NDRF च्या ताफ्याने तीन बोटींच्या मदतीने त्यांची सुटका केली.
अन्नाचा एकही घास नाही
बचावलेल्या ग्रामस्थांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. आमच्यापर्यंत कोणतेही फूड पॅकेट पोहोचले नाही. स्वच्छ पिण्याचे पाणीही मिळाले नाही. तीन दिवस उपाशी राहून गढूळ पाणी प्यावे लागले. हेलिकॉप्टर आलं तेव्हा दोन फेऱ्यांमध्ये फक्त दहा जणांना नेलं. त्यानंतर ते परत आलंच नाही,असा रोष त्यांनी व्यक्त केला.
भावनिक क्षण
सुटकेनंतर अडकलेल्या नागरिकांचे कुटुंबीय अश्रूंना वाट मोकळी करून भेटले. आठ दिवसांपूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झालेले एक वयोवृद्ध व्यक्ती या गटात होते. औषधं घेता आली नाहीत. पोटात काहीही न टाकता चार दिवस काढले,” असं त्यांनी सांगितलं.
NDRF ची सफाई
दारफळला भागात पुराचा प्रचंड प्रवाह असल्याने सुरुवातीच्या प्रयत्नात बरडवस्तीत प्रवेश करणे शक्य झाले नाही. मात्र आज सकाळी प्रवाह ओसरल्यावर तीन बोटींच्या मदतीने सुटका करण्यात आली,” असं NDRF च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे माढा परिसरातील ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.