
सोलापूर प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, घरे, जनावरे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराज्याच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या या पावसाने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पूरग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकल्या.
निमगावातील भीषण चित्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यातील निमगाव आणि दारफळ या गावांमध्ये गेले. निमगावमध्ये तब्बल ५० ते ६० घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. गावातील शेकडो हेक्टर शेतजमिनीवरून माती वाहून गेली असून, अनेक शेतं अक्षरशः उजाड झाली आहेत. पावसाचे पाणी इतक्या वेगाने गावात शिरले की, शेतकऱ्यांची घरे, जनावरे, मोटारी, सिंचनासाठी बसवलेले पाईप, पोल व तारा वाहून गेल्या.
स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “गेल्या पन्नास वर्षांत इतका पाऊस कधीच झाला नव्हता. यंदा मात्र निसर्गाने जबर फटका दिला आहे.” अनेक शेतकरी कर्जबाजारी असल्याने या नुकसानीतून सावरणे कठीण होणार असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्रीसमोर मांडले.
अजित पवारांचा माढा दौरा
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मुंगशी गावाला भेट दिली. त्यांनी सीना नदीवरील बंधाऱ्याची पाहणी करून तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गावकऱ्यांनी सांगितले की, ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहिलेले नाही. घरे कोसळली, तर वीजेचे पोल, तारा, डिपो वाहून गेले. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांनी शासनाकडे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
“हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये मदत द्या,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली. अजित पवारांनी मोटारी व डिपोंच्या भरपाईबाबत आश्वासन दिले. त्यांनी यावेळी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा जलदगतीने करून शासनाला अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदतीचा ओघ
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपले एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केली आहे. तर आमदार सुरेश खाडे यांनी तब्बल दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांकडूनही मदतीची अपेक्षा आहे. या योगदानामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळणार असून पुनर्वसन आणि मदतकार्याला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे, अशी भावना मदतकार्यामुळे उमटताना दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या आर्त हाक, सरकारच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
पूरग्रस्त शेतकऱ्यांचे एकच म्हणणे आहे की, शासनाने सरसकट नुकसानभरपाई जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्यावी. विशेषतः ऊस पिकाचे झालेले नुकसान आणि घरे कोसळल्यामुळे शेतकरी उभ्या आयुष्यभराच्या कष्टावर पाणी फिरल्याची खंत व्यक्त करत आहेत.
राज्य सरकार या अभूतपूर्व आपत्तीला कशाप्रकारे सामोरे जाते आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणते निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.