
कल्याण प्रतिनिधी
कल्याण,डोंबिवलीत भाजप व काँग्रेस यांच्यातील संघर्ष चिघळला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विडंबनात्मक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत त्यांना घेरून जबरदस्तीने साडी नेसवली आणि त्यांचा “सत्कार” केला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वाद पेटला आहे.
पगारे म्हणाले, “मला खोटं सांगून बोलावलं आणि अपमानस्पद वागणूक देत जबरदस्ती साडी नेसवली. मी काँग्रेसचे काम अखेरच्या श्वासापर्यंत करत राहीन. भाजपच्या गुंडाविरोधात लढत राहणार.
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब व माजी नगरसेवक संदीप माळी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन पगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परब म्हणाले, “पगारे यांनी पंतप्रधानांचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.
दुसरीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी संताप व्यक्त करत सांगितले, “ज्येष्ठ नागरिकाचा अपमान हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा व संबंधितांना अटक करावी. भाजपा कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे.
प्रकाश पगारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात नरेंद्र मोदी साडी नेसलेले दिसत होते आणि पार्श्वभूमीला ‘मीच माझ्या रुपाचं…’ हे गाणं लावण्यात आलं होतं. या पोस्टनंतर भाजप कार्यकर्ते संतप्त झाले.
या घटनेमुळे कल्याण,डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं असून काँग्रेस व भाजप यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.