
कल्याण प्रतिनिधी
डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे (७२) यांच्यावर भर रस्त्यात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शालू नेसविल्याच्या प्रकाराने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या पगारे यांना तातडीने कल्याण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडीच्या वेशातील प्रतिमा समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर भाजप नेत्यांनी संतापाच्या भरात हा प्रकार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी भाजपवर “दडपशाही आणि हुकूमशाही वृत्तीचे राजकारण” केल्याचा आरोप केला. “ज्येष्ठ नेत्याला भर रस्त्यात साडी नेसविण्याइतकी भीती भाजपला वाटते, हे लोकशाहीस शोभणारे नाही,” असे पोटे म्हणाले.
पगारे यांच्यावर गैरवर्तन करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसने तीव्रतेने केली आहे. गुरुवारी सकाळी नवेंदू पाठारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली. “या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी काँग्रेसने पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.
या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर देवीला साडी अर्पण करत भाजप नेत्यांना सुबुद्धी यावी, अशी प्रार्थना केली.
दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी काँग्रेसच्या आरोपांना फेटाळून लावत “आमच्या आदरणीय नेत्याची बदनामी सहन केली जाणार नाही. चौकशीला आणि कोणत्याही कारवाईला आम्ही तयार आहोत,” अशी ठाम भूमिका मांडली.
शालू प्रकरणामुळे कल्याण,डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस,भाजपमध्ये राजकीय तापमान चढले असून आगामी दिवसांत या वादाला आणखी उधाण येण्याची चिन्हे आहेत.