
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्रात वाहन उद्योगाच्या विस्ताराला नवी दिशा देत ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेडने तळेगाव प्रकल्पासाठी तब्बल ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. आधीच्या सात हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत वाढ करून कंपनीने हा निर्णय घेतला असून, या प्रकल्पामुळे सुमारे ७ हजार ६०० प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत.
ह्युंदाई मोटार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १५ सप्टेंबर रोजी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. “वाहन उद्योगात ह्युंदाई ही विश्वासार्ह कंपनी आहे. पुण्यातील या प्रकल्पातून केवळ उत्पादनक्षमता वाढणार नाही, तर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल,” असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
कंपनीच्या माहितीनुसार, वाढीव गुंतवणूक प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान, सेव्हन्थ जनरेशन पेंट शॉप, ऑटोमेशन साधने, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि ई-वाहन निर्मितीची तयारी यावर खर्च करण्यात येणार आहे. तळेगावमधून तयार होणाऱ्या मोटारी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविल्या जाणार आहेत.
राज्यातील सामाजिक जबाबदारी अंतर्गत ह्युंदाई कंपनी ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. या माध्यमातून सुरू असलेली विविध कामे पथदर्शी ठरतील, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे तळेगाव परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून, अप्रत्यक्ष रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे ह्युंदाई मोटार इंडियाने स्पष्ट केले आहे.