
पुणे प्रतिनिधी
शालेय शिक्षण विभागाने २०२४-२५ या वर्षासाठीच्या ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर केले असून, राज्यातील १०९ शिक्षकांची यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांचा सन्मान येत्या सोमवारी (ता. २२) मुंबईत होणार आहे.
राज्यात १९६२-६३ पासून सुरू झालेल्या या पुरस्कार योजनेअंतर्गत नि:स्वार्थी सेवाभाव, निष्ठा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षकांना गौरविण्यात येते. यावर्षी २५ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य निवड समितीच्या बैठकीत शिक्षकांची प्रवर्गनिहाय निवड करण्यात आली होती. त्या शिफारशींनुसार सरकारने अंतिम यादी जाहीर केली.
पुण्यातील सन्मानित शिक्षक
* छाया जगदाळे, सहाय्यक शिक्षक (प्राथमिक) जिल्हा परिषद शाळा, जगतापवस्ती (ता. पुरंदर)
* निलम गायकवाड, सहाय्यक शिक्षक (प्राथमिक) सर सेनापती जनरल अरूणकुमार वैद्य प्राथमिक विद्यालय, महापालिका शाळा क्र. ९१, मुलांची खुळेवाडी
* मनोज नायकवाडी, सहाय्यक शिक्षक (माध्यमिक) स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा, हिवरे कुंभार (ता. शिरूर)
* संजीव वाखारे, सहाय्यक शिक्षक (माध्यमिक) श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चिंचवडगाव
* संगिता हिरे, सहाय्यक शिक्षक (आदिवासी क्षेत्र – प्राथमिक) जिल्हा परिषद शाळा, मुथाळणे (ता. जुन्नर)
* भारती भगत, सहाय्यक शिक्षक (विशेष शिक्षक – कला) लोयोला हायस्कूल, पाषाण रस्ता
प्रवर्गनिहाय पुरस्कारांची संख्या
* प्राथमिक : ३८
* माध्यमिक : ३९
* आदिवासी क्षेत्र (प्राथमिक) : १९
* थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार : ८
* विशेष शिक्षक कला/क्रीडा : २
* दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक : १
* स्काऊट/गाइड : २
* एकूण : १०९
शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कारामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतरांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.