
नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शासकीय शाळांबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला असून, हा उपक्रम राज्यभरात कौतुकास्पद ठरत आहे.
❣️❣️
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा प्रवेश जि.प. शाळा टोकरतलाव गावात घेतला आहे.या शाळेत मराठी, आदिवासी, अहिराणी विद्यार्थी आहेत.
नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे.@MittaliSethiIAS#महाराष्ट्र #जि_प_शाळा pic.twitter.com/tz6A2cdXJG
— Sandeep Tikate (@SandeepTikate) September 18, 2025
आजकाल बहुतेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खासगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देताना दिसतात. यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. मात्र जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी या प्रवाहाला छेद देत आपल्या तीन वर्षांच्या जुळ्या मुलांना,सबर आणि शुकर,यांना नंदुरबार शहरातील टोकरतलाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या अंगणवाडीत दाखल केले आहे.
शहरातील उच्चभ्रू शाळांचा पर्याय उपलब्ध असतानाही डॉ. सेठी यांनी आपल्या मुलांचा प्रवेश शासकीय शाळेत करून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक संदेश दिला आहे. शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा मिळतात. सेविकांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा पाहून मी प्रभावित झाले. समाजात सरकारी शाळांबाबत विश्वास निर्माण व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे,असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी मुलांना शाळेत सोडायला जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्या या कृतीचे राज्यभरात कौतुक होत आहे. इतर पालकांसाठीही हा निर्णय प्रेरणादायी ठरत असल्याचे सर्वत्र मत व्यक्त केले जात आहे.