
मुंबई प्रतिनिधी
दादर येथील शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याची घटना मंगळवारी उघड झाली. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवाजी पार्कवर दाखल होऊन पुतळ्याची पाहणी केली. यावेळी पक्षाचे खासदार, आमदार तसेच नेते मंडळी उपस्थित होती. उद्धव ठाकरेंसोबत मनसे नेते बाळानांदगावकर हे देखील हजर होते. शिवसैनिकांनी आधीच पुतळ्याची स्वच्छता करून पुष्प अर्पण केले होते.
अत्यंत निंदनीय प्रकार
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. या मागे दोनच वृत्ती असू शकतात. पहिली म्हणजे स्वतःच्या आई-वडिलांचं नाव घेण्यास ज्यांना लाज वाटते, अशा लावारीस वृत्तीची व्यक्ती. किंवा दुसरी, बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा अपमान करून जसा अयशस्वी बिहार बंदचा प्रयत्न झाला, तसा महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असू शकतो.
ठाकरे पुढे म्हणाले, तूर्त पोलीस तपास करत आहेत. आम्ही सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पुढे काय उलगडते, ते पाहू.
राज ठाकरेंचीही भेट
प्राप्त माहितीनुसार, उद्धव ठाकरेंच्या अगोदर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील पुतळ्याजवळ येऊन पाहणी केली होती. दिवसभरात विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत होते. वाढलेल्या गर्दीमुळे पोलिसांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.