
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आणखी बळ मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ यांनी सोमवारी महिलांसाठी नवा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, पात्र लाभार्थी महिलांना जिल्हा बँकांच्या माध्यमातून एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
गेल्या वर्षी शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केलेल्या या योजनेत सध्या दरमहा पंधराशे रुपयांचा थेट लाभ महिलांच्या खात्यात जमा केला जातो. जुलै २०२३ पासून सुरू झालेली ही योजना अखेरपर्यंत कायम आहे. मात्र, काही महिन्यांपासून हप्ते उशिरा जमा होऊ लागल्याने लाभार्थींमध्ये नाराजी होती. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला, तर सप्टेंबरचा पैसा ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिलांसाठी नव्या आर्थिक सहाय्याची घोषणा केली. “लाडक्या बहिणींसाठी गावागावांतून पतसंस्था उभारल्या जातील. त्याद्वारे महिलांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. तेही बिनव्याजी. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी राज्यातील सुमारे एक कोटी महिलांना “लखपती दीदी” बनवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. या कर्जातून महिला स्वतःचे उद्योगधंदे उभारतील, स्वावलंबी होतील आणि कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पूर्वीपासूनच या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर लाडक्या बहिणींसाठीची पतसंस्था लवकरच उभी राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.