
मुंबई प्रतिनिधी
डिजिटल पेमेंटच्या विश्वात सतत नवे प्रयोग करणाऱ्या पेटीएमने आता ग्राहकांसाठी एक मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. ‘पेटीएम पोस्टपेड UPI क्रेडिट लाईन’ या नव्या फीचरमुळे ग्राहकांना आता खरेदीसाठी आधी पैसे खर्च करून ते ३० दिवसांनी परतफेड करण्याची संधी मिळणार आहे, तेही व्याजशून्य.
पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांच्या संयुक्त उपक्रमातून ही सुविधा सुरू झाली आहे. सुरुवातीला ही सेवा निवडक ग्राहकांना उपलब्ध होणार असून टप्प्याटप्प्याने सर्वांसाठी खुली केली जाईल.
काय आहे ही सुविधा?
रोजच्या व्यवहारांसाठी UPI वर क्रेडिटची सुविधा.
दुकानात QR कोड स्कॅनपासून ऑनलाइन शॉपिंग, फूड ऑर्डर, मोबाईल वीजबिले, रिचार्ज अशा सर्व व्यवहारांसाठी उपयुक्त.
खर्च झाल्यानंतर लगेच पैसे भरण्याची गरज नाही; बिल पुढील महिन्यात भरता येणार.
३० दिवसांपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
कोणाला फायदा होणार?
ही योजना विशेषत: नोकरदार वर्गासाठी आणि महिनाअखेर ‘कॅश टंचाई’ अनुभवणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये रोख पैशाऐवजी डिजिटल पेमेंटला चालना मिळेल.
कसे मिळवावे?
ग्राहकांनी आपल्या पेटीएम ॲपमधील ‘पोस्टपेड’ पर्याय निवडून KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर खाते सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेद्वारे UPI ला जोडावे लागेल.
पेटीएमच्या या नव्या उपक्रमामुळे डिजिटल पेमेंट अधिक सोयीस्कर आणि कॅशविरहित व्यवहारांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.