मुंबई प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांना परवडणारी व पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी प्रवासी भाडेदर निश्चित करण्यात आले असून, तो तत्काळ लागू होणार आहे.
भाडेदर ठरले असे
इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान ₹१५ भाडे अनिवार्य असेल. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला ₹१०.२७ इतका दर आकारण्यात येणार आहे. प्रवास कितीही छोटा असला, तरी किमान भाडे प्रवाशांना भरावेच लागणार आहे.
परवाना व कार्यक्षेत्र
मुंबई महानगर क्षेत्रात या सेवेसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने तीन प्रमुख कंपन्यांना उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि., आणि अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. तात्पुरता “प्राव्हिजनल लायसन्स” मंजूर केला आहे. हा परवाना ३० दिवसांसाठी वैध असून, मुदत संपल्यानंतर कंपन्यांना अंतिम परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
सरकारचा उद्देश:
या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून, वाहतूककोंडी व प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
थोडक्यात…
• किमान भाडे : ₹१५
• त्यानंतर प्रति किमी दर : ₹१०.२७
• उबेर, रॅपिडो व अॅनी टेक्नॉलॉजीजना तात्पुरता परवाना
• मुंबई महानगर क्षेत्रात प्रायोगिकरित्या सेवा सुरू


